चिकन मटनची दुकाने सुरु ठेवण्याची मागणी
आषाढी आमावस्येचा दिवस
शिरूर: आषाढी आमावस्येच्या दिवशी चिकन मटनची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी शहरातील चिकन मटन व्यावसायिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली. या व्यावसायिकांना परवानगी देण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी यांनी आमदार तसेच प्रांताधिकाऱ्यांकडे केली.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रांताधिकाऱ्यांनी शहरात दहा दिवसांचे लॉक डाऊन जाहीर केले आहे. या लॉकडाऊनची सुरुवात नेमकी रविवार म्हणजेच आषाढी आमावस्येच्या दिवशी होणार आहे. हा दिवस चिकन मटन व्यावसायिकांसाठी महत्वाचा असतो कारण या दिवशी चिकन मटनची मोठ्या प्रमाणावर विक्री होते.तसेच यानंतर श्रावण ते दसऱ्या पर्यंत या व्यावसायिकांची दुकाने बंद असतात. रविवार बंदमुळे मोठे नुकसान होणार असल्याने रविवारी दुपारपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी शहरातील व्यावसायिकांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडे आज केली.श्रावण महिना, गणेशोत्सव ते दसऱ्या पर्यंत बहुतांशीी नागरिक मांसाहार करीत नाही. म्हणून आषाढाच्या शेवटच्या दिवशी चिकन मटनच्या दुकानांवर खरेदीसाठी नागरिकांच्या उड्या पडतात.यादिवशी फार मोठया प्रमाणावार चिकन मटनची विक्री होते. चिकन मटन व्यावसायिकांसाठी व्यावसायिकदृष्ट्या हा दिवस फार महत्वाचा असतो.यासाठी हे व्यावसायिक आठवडाभरापासूनच तयारी करतात शहरातील जवळपास अशा दिडशे व्यावसायिकांनी कोंबड्या तसेच मेंढ्यांची मोठया प्रमाणावर खरेदी केत्ती आहे.अशात रविवारी दुकाने बंद राहिल्यास या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागेल. यामुळे या व्यावसायिकांना रविवारी दुपारपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नगरसेवक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कुरेशी यांनी आमदार अॅड अशोक पवार व प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडे केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ.असे देशमुख यांनी सांगीतल्याची माहिती कुरेशी यांनी दिली.