शिरूर:शिरूर ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे अपघातग्रस्त व्यक्तिला रूग्णवाहिकेतच उपचाराअभावी बराच वेळ यातना सहन कराव्या लागल्या.
काल (१०जून ) दुपारी शिरूर न्हावरे रस्त्यावर करडे गावाजवळ एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. अपघातग्रस्त व्यक्तिला १०८ रुग्णवाहिकेतून शिरुर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्या व्यक्तिला मार लागल्याने रक्तस्त्राव सुरू होता.पायाला वेदना होत असल्याने तो विव्हळत होता.तेथे आल्यानंतर प्रथमोपचारासाठी या व्यक्तिस त्वरीत कॅज्युएल्टीमध्ये हलवणे गरजेचे होते.मात्र बराच वेळ हा व्यक्ति रुग्णवाहिकेतच विव्हळत पडला होता. मनविसेचे तालुकाध्यक्ष स्वप्निल माळवे हे काही कामानिमित्त रुग्णालयात उपस्थित होते. त्यांच्या निदर्शनास ही बाब आली.त्यांनी या रुग्णाला त्वरीत रूग्णालयात घ्या असे तेथिल सिस्टर्सना सांगितले. वैद्यकिय अधीक्षक, इतर डॉक्टर्स कुठे आहेत असे विचारले असता, एकच महिला डॉक्टर उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. रुग्णाला इतक्या वेळ कॅज्यूएल्टीमध्ये दाखल का केले नाहीत.असे विचारले असता, रुग्णाला उचलून घेणारे ब्रदर्स जाग्यावर नसल्याने उशिर झाल्याचे माळवे यांना सांगण्यात आले.
माळवे यांनी अपघातग्रस्त बराच वेळ रुग्णवाहिकेतच विव्हळत पडल्याची चित्रफित काढल्याने त्यास त्वरीत कॅज्यूएल्टीमध्ये नेऊन त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले.या रुग्णालयात रुग्णाची हेळसांड होण्याचे प्रकार वारंवार पुढे येत आहे.या रूग्णालयात सर्वसामान्य कुटुंबातील महिला प्रसुतीसाठी जातात. मात्र बहुतांशी महिलांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते इथे प्रसुती होणार नाही. इतर रुग्णालयात अथवा ससूनला जाण्याचा सल्ला दिला जातो. मागील महिन्यात एका मजूर गर्भवती महिलेला जन्मलेल्या मुलाच्या जीवाला धोका होऊ शकतो.अशी भीती घालून प्रसुतीसाठी इतर रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला.मात्र या महिलेची नगर येथील रुग्णालयात अगदी सुखरूप प्रसुती झाली.आई व बाळ दोघांनाही कसलाही धोका झाला नाही.रुग्ण आला की आपली जबाबदारी झटकून रुग्णास ससूनला जाण्याचा सल्ला देण्याचे प्रकार या रुग्णालयात सर्रास पाहवयास मिळतात. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकही गंभीर नाहीत.अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या प्रश्नाकडे कोणी गांभीर्याने लक्ष देईल का हा प्रश्न आहे.
|
|
Prev Post
Next Post