शिरूर: शहरातील महिलांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत वटपौर्णिमा साजरी केली. दर वर्षी दिसणारी गर्दी मात्र यावेळी दिसून आली नाही. नियमांचे पालन करून का होईना वडाच्या झाडाचे पूजन करता आले,यात खंड पडला नाही. याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे यांनी व्यक्त केली.
वटपौर्णिमेला विवाहीत महिला पतीला उत्तम आरोग्य लाभावे तसेच दिर्घायुष्य लाभावे यासाठी व्रत करतात.वडाच्या झाडाची पुजा करतात. दरवर्षी वटपौर्णिमेला शहरात सर्वत्रच नटून खटून हातात पुजेचे ताट घेऊन वडाच्या झाडाची पुजा करण्यास निघालेल्या महिला पाहवयास मिळतात. या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महिलांची संख्या तुरळकच दिसून आली.एका जागी गर्दी करण्यास मनाई असल्याने महिलांनी एकत्रितरित्या पुजेला जाण्याचे टाळले. एक किंवा दोघी एकत्र पुजेला जाताना दिसून आले. वेथील विद्याधाम प्रशालेच्या आवारातील वडाच्या झाडाला पुजताना महिलांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन केल्याचे दिसून आले. त्यांनी मास्कही परिधान केलेला होता. या महिलांमध्ये माजी नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे या देखिल पुजेसाठी उपस्थित होत्या.त्या म्हणाल्या,कोरोनामुळे गेली अडिच महिन्यांपासून अनेक बंधनांना सामोरे जावे लागले आहे. एक जूनपासून लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. त्यामुळे नियमांच्या चौकटीतका होईना आज आम्हा महिलांना वडाच्या झाडाला पुजण्यासाठी बाहेर पडता आले.आम्ही सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करुन तसेच मास्कही परिधान करून पुजा केल्याचे लोळगे यांनी सांगितले.