…..बघतोय रिक्षावाला.. मदतीची वाट बघतोय रिक्षावाला….

व्यवसाय बंद असल्याने रिक्षाचालक अडचणीत

0

शिरूर: कामावर जायला उशिर झाईला….. बघतोय रिक्षावाला अन् वाट माझी बघतोय रिक्षावाला….. हे गाणे सर्वांनाच परिचित असेल. लॉकडाऊनमुळे मात्र रिक्षावाला कोणा ग्राहकाची नव्हे तर मदतीची वाट बघतोय असे चित्र आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून गेली ६८ दिवसांपासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. चौथा लॉकडाऊन जाहीर करताना सरकारने कन्टेन्मेंट झोन वगळता काही बंधने घालून अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्न केला. यामुळे कारखाने तसेच विविध व्यवसाय सुरू झाले. मात्र ग्राहकांअभावी रिक्षावाल्यांचा व्यवसाय मात्र सुरू होऊ शकला नाही. प्रवासी, कामगार, मजूर हेच  रिक्षावाल्यांचा ग्राहकवर्ग आहे.सरकारने स्थानिक पातळीवर एसटी ची सेवा सुरू करण्यास परवानगी दिली.मात्र शिरुरमध्ये प्रवाशांअभावी एसटी बसेसची चाके फिरली नाहीत. कारखान्यांना परवानगी मिळाली. मात्र मोठ्या प्रमाणावर राज्य तसेच परराज्यातील कामगार आपापल्या घरी परतल्याने रांजणगांव एमआयडीसीतील कारखान्यांचे उत्पादन ठप्प झाले. परिणामी रिक्षाावाल्यांचे व्यवसाय सुरू होऊ शकले नाहीत.शहरात रामलिंग, संघर्ष, शिवनेरी, जनसेवा, रिक्षा पंचायत आदि रिक्षा संघटनांचे मिळून जवळपास अडीचशे रिक्षा आहेत.

          दिवसभर रिक्षा स्टॅण्डवर नंबरला थांबायचे. नंबर आला की भाडे करायचे. दिवसभरातून साधारण चारशे ते पाचशे रुपयांचा या रिक्षावाल्या बांधवांचा व्यवसाय…नऊ ते दहा हजार रुपयाचे सरासरी मासिक उत्पन्न. या उत्पन्नावर कोणाच्या घरातील चार तर कोणाच्या आठ व्यक्ती अवलंबून.गेली दोन महिन्यांपासून या बांधवांचे उत्पन्न बंद आहे.यांना मात्र अद्याप कोठूनही मदत मिळाली नाही.उसनेपासने पैसे घेऊन कसेबसे कुटुंब चालवण्याचा खटाटोप त्यांना करावा लागत आहे.सतिश कर्डे या रिक्षाचालकाच्या उत्पन्नावर घरातील सातजण अवलंबून आहे. वडिल आजारी असतात. एक मुलगा ‘विशेष’आहे. या दोघांच्या औषधपाण्यासाठीचा खर्चही त्यांना करावा लागतो. सद्या व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या पुढे कुटुंब कसे चालवायचे हा प्रश्न आहे.जवळपास बहुतांशी रिक्षाचालक बांधवांची परिस्थिती कमी अधिक प्रमाणात अशीच आहे.सद्य परिस्थिती पाहता कोणी कामावरच जात नसल्याने रिक्षावाले कोणाची वाट बघत नसून मदतीची वाट बघत असलयाचे चित्र आहे. या बांधवांचे व्यवसाय कधी सुरू होतील याची शाश्वती नाही. यामुळे या बांधवांना तातडीची मदत मिळणे गरजेचे आहे.पुणे येथे युवा स्पंदनच्या चेतन धोत्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रिक्षाचालक बांधवांना प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत मिळवून दिली.असाच प्रयत्न शहरात व्हावा अथवा शासनाने त्यांना भरीव मदत करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.