शिरूर : पंधरवडयापूर्वी चासकमानचे आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे न्हावरे गांवासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही पाणी मिळत नाही.असा आरोप करीत आवर्तनासाठी न्हावरे ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. न्हावरेच्या उपसरपंच दिपाली खेडकर यांनी याबाबत तहसिलदारांना निवेदन दिले आहे.
निवेदनानुसार १७ मार्चला चासकमानचे आवर्तन सोडण्यात आले. न्हावरे गांवातील क्रमांक २१च्या चारीला १५ एप्रिलला पाणी आले.मात्र प्रशासनाने मधेच तीन दिवसांनी वेळ नदीला पाणी सोडल्याने न्हावरेकरांचे पाणी पळाले. यामुळे पिके पूर्णतः जळाली. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. अधिकाऱ्यांचा गलथान व मनमानी कारभार यास कारणीभूत असल्याचा न्हावरेकरांचा आरोप आहे. प्रशासनाने न्हावरेस पाणी सोडण्यासंदर्भात तातडीने नियोजन करावे या मागणीसाठी चारी क्रमांक २० च्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच जमावबंदी आदेशाच्या नियमाचे पालन करीत राष्ट्रवादी युवकचे शिरूर तालुकाध्यक्ष सागरराजे निंबाळकर, विघ्नहर्ता सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब खंडागळे, माजी उपसरपंच अरूण तांबे , सागर खंडागळे यांनी आजपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. याबाबत चासकमानचे अधिकारी मोरे यांच्याशी संपर्क साधला असता वेळ नदीला पाणी सोडण्याचा वरिष्ठांचा निर्णय असल्याचे सांगीतले. वरिष्ठ अधिकारी बाळासाहेब शेटे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सागरराजे निंबाळकर यांनी मात्र कनिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत नसल्याचा तसेच अधिकारी शेतकऱ्यांमध्ये भांडणं लावत असल्याचा आरोप केला.