शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:एकेकाळचा सगळ्या बाजूने भक्कम असलेला घोडगंगा तोट्यात आणि स्वतःचा व्यंकटेश कृपा मात्र फायद्यात.याचे नेमके गमक काय आहे.हे आमदार अशोक पवार यांनी सांगावे.उगाच भंपक गोष्टी करून लोकांची दिशाभूल करू नये.शेतकऱ्यांना वेठीस कोणी धरले याचे उत्तर तेच देतील.असा खोचक टोला घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे यांनी लगावला.
न्हावरे येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार पवार यांचा चांगलाच समाचार घेतला.यावेळी त्यांनी घोडगंगा नेमका कसा बंद पडला याची सविस्तर माहिती दिली.यात कारखान्यावर असलेले विविध बँकांचे कर्ज,जप्तीच्या नोटिसा,कारखान्याचा तोटा.याची आकडेवारीच जाहीर केली.असे असताना कारखाना लुटून गब्बर झालेल्या आमदार पवार यांनी खोटं बोल रेटून बोल याचा जणू सपाटाच लावला आहे.घोडगंगा लुटून शेतकऱ्यांचे वाटोळे करणारा हा व्यक्ती उपमुख्यमंत्री पवार हे शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचे म्हणत आहे हा मोठा विनोद म्हणावा लागेल.पंचवीस वर्ष कारखान्याचे अध्यक्ष म्हणून राहून कारखान्याच्या जीवावर हा व्यक्ती मोठा झाला.ज्याने मोठे केले त्या कारखान्याला मातीत घालण्याचा डाव रचला.याचे पहिले पाऊल म्हणजे आपला स्वतःचा खासगी कारखाना उभारला.लोकांना सांगितले क्षेत्रात जादा उस असल्याने अशा कारखान्याची गरज आहे.हा कारखाना जसा सुरू केला तसा घोडगंगाची अधोगती सुरू झाली.अगदी नियोजन पूर्व डाव रचून स्टेप बाय स्टेप कारखाना खिळखिळा करत अखेर बंद पाडला.२५ वर्षाचा अनुभव पाठीशी असताना,दारात लाखो टन ऊस सहज उपलब्ध असताना खरे तर घोडगंगा राज्यातील एक नंबरचा कारखाना असायला हवा होता.उलट आज कारखाना ६४ कोटी रुपये तोट्यात असल्याचे वास्तव आहे.
एकीकडे घोडगंगा तोट्यात असताना व्यंकटेश कारखाना मात्र फायद्यात आहे.हा विरोधाभास कसा याचे उत्तर आमदार पवार यांनी प्रथम द्यायला हवे.पवार यांना पराभव दिसू लागल्याने त्यांची वैफल्यग्रस्त अशी अवस्था झाली असून ते काहीही वक्तव्य करू लागल्याचे दुर्दैवी चित्र असल्याचे दादापाटील फराटे म्हणाले.