शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:आमदारपुत्र प्रकरण राजकीय अथवा जातीय नसून मुख्य आरोपीस कर्ज झाल्याने त्याने मारहाण व खंडणीचा गुन्हा केल्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले.
आमदार अशोक पवार यांचे चिरंजीव, रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषीराज पवार यांच्या फिर्यादीनुसार भाऊसाहेब विरा कोळपे (वय ३० रा.कोळपे वस्ती,मांडवगण फराटा)यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.यात कोळपे यांच्यासह मयुर संजय काळे (वय २४ रा.शिवाजी चौक,मांडवगण फराटा) व तुषार संजय कुंभार (वय २१ रा.,मांडवगण फराटा) या तिघांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणात कोळपे याने गुन्ह्याची कबुली दिली असून १५ लाख रुपयांचे कर्ज झाल्याने हा गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले आहे.ज्या ठिकाणी गुन्हा घडला तो बंगला आरोपीच्या बहिणीचा असून गुन्ह्याचा व्हिडिओ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तू देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या असल्याचे केंजळे यांनी सांगितले.ऋषिराज पवार यांचे महिलेसोबत अश्लील फोटो काढून त्यांना दहा कोटींची खंडणी मागितल्याचा प्रकार नऊ नोव्हेंबर रोजी समोर आला होता.या गंभीर प्रकरणाला राजकीय वळण प्राप्त झाले होते. विरोधकांचे आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप आमदार अशोक पवार यांनी केला होता.तर महायुतीच्या वतीने या घटनेची सखोल चौकशीची मागणी तसेच याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली होती.