शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष
प्रदीप कंद यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन महायुती धर्म पाळणार असल्याचे संकेत दिल्याने महायुतीच्या दृष्टीने ही शुभवार्ता असल्याचे बोलले जात आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचा आदेश कंद हे पाळणार असल्याने महायुतीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने माऊली कटके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाल्यावर कंद यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून बंडखोरी केली होती. महायुती मधील या बंडखोरीमुळे मतांमध्ये विभाजन होऊन महायुतीला फटका बसेल असे म्हटले जात होते. मात्र कंद यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस व पवार यांचे महायुती धर्म पाळण्याचे आदेश पाळून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पत्रकारांनी कंद यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. कोणी काही शब्द दिला म्हणून त्यांनी उमेदवारी मागे घेतली का? या प्रश्नावर त्यांनी मी सत्तेसाठी हपापलेलो नाही.तसेच कोणी काही शब्द दिला म्हणून मी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची बैठक घेतली.त्या बैठकीत त्यांनी महायुती धर्म पाळण्याचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री पवार यांनी देखील फोन करून महायुती धर्म पाळण्याचे तसेच एकमेकाला मदत करण्याचे आवाहन केले या दोन्ही नेत्यांचा सन्मान ठेवण्यासाठी अर्ज माघार घेतल्याचे कंद यांनी सांगितले.राजकारणात पदांसाठी राजकारण करायचे नसते.वरिष्ठ नेते जेव्हा एखादी भूमिका मांडतात त्याचा सन्मानही राखायचा असतो.मात्र सन्मान ठेवत असताना भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही या अटीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे.असे कंद यांनी सांगितले.महायुतीमध्ये काही मतभेद जरी असले संबंधितांची समजूत काढून त्यांना प्रक्रियेत आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. असेही कंद यांनी स्पष्ट केले.
एकूणच कंद यांनी आपली भूमिका मांडताना महायुतीचे उमेदवार कटके यांचा मनापासून प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कंद हे आज भाजपा मध्ये असले तरी कधीकाळी उपमुख्यमंत्री पवार यांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून राहिले आहेत.भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांचेही विश्वासू बनलेले आहेत.अशात या दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांनी कंद यांना महायुती धर्म पाळण्याचे आवाहन केल्याने कंद यांना महायुती धर्म पाळणे अपरिहार्य झाल्याचे दिसून येत आहे.कंद यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून चांगले काम केले आहे. शिरूर हवेली मतदारसंघात असणाऱ्या हवेली विभागात त्यांनी अनेक विकासाची कामे केलेली आहेत.याचा महायुतीच्या उमेदवारास निश्चित फायदा होऊ शकेल.
संजय पाचंगे देखील महायुती धर्म पाळणार..
पवार यांचे कट्टर विरोधक भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेत महायुती धर्म पाळणार असल्याचे स्पष्ट केले.आपल्याला उपमुख्यमंत्री पवार यांचा फोन आला होता.पवार यांनी त्यांना महायुती धर्म पाळण्याचे आवाहन केले.यावर पाचंगे यांनी रावसाहेब दादा घोडगंगा सहकारी साखर कारखाना खाजगी होऊ देणार नाही याचा शब्द उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मागितला. यावर पवार यांनी असा शब्द दिल्याने आपण माघार घेतल्याचे पाचंगे यांनी सांगितले.