शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: ‘सण करूया साजरे, माध्यम जरासे वेगळे’ या उपक्रमांतर्गत येथील युवा स्पंदन सोशल फाउंडेशनच्या वतीने स्मशानभूमीत दीपोत्सव साजरा करण्यात आला.उदास आणि भकास वाटणारा आणि अंधश्रद्धेने अंधारलेल्या अमरधाम स्मशानभूमीत अंधश्रद्धा निर्मूलनाचे दीप प्रज्वलित करण्यात आले. सकारात्मकतेचा उजेडाने सारा परिसर उजळून निघाला.
नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या स्पंदनच्या शिलेदारांनी नऊ वर्षांपूर्वी स्मशानभूमीमध्ये दीपोत्सव हा उपक्रम सुरू केला.प्रियांका धोत्रे या युवतीच्या मनातील ही संकल्पना.ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात.ती जागा अपशकुनी असते अथवा इतरही अंधश्रद्धा स्मशानभूमीबद्दल आहे. समाजातील ही अंधश्रद्धा दूर व्हावी, सामाजिक बांधिलकी जपली जावी हा उद्देश हा उपक्रम सुरू करण्यामागे आहे.येथील अमरधाम या स्मशानभूमीत दिवसाही जायला लोग धजावत नाहीत.अशा ठिकाणी युवा स्पंदनचे युवा युवती यांनी संध्याकाळी तेथे जाऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचे दीप प्रज्वलित केले.सुरुवातीला परिसर स्वच्छ करून सडा टाकून सुबक अशी रांगोळी रेखाटण्यात आली.त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परिसरातील दिप प्रज्वलित करण्यात आले. स्मशानभूमीची देखभाल करणारे तसेच अंत्यसंस्कार विधी करणाऱ्या जाधव या स्मशानजोगी कुटुंबाचा पोशाख, दिवाळी फराळ तसेच रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मानाने जाधव कुटुंबीय भारावून गेले. सन्मानाबद्दल गंगाराम जाधव यांनी कृतज्ञ भावना व्यक्त केली.
युवा स्पंदनचे शिलेदार सातत्याने समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात.यातच स्मशानभूमीत दीपोत्सव हा आगळावेगळ उपक्रम समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड.सुभाष पवार यांनी व्यक्त केला. उद्योजक युवराज सोनार, कलीम सय्यद, अदनान शेख, स्वप्नील पवार, मेजर संतोष सांबरे, आधारछाया फाउंडेशनच्या प्रमुख सविता बोरुडे,डॉ.वैशाली साखरे,ओन्ली वुमन्स जिमच्या प्रमुख प्रिया बिरादार आदी मान्यवर यावेळी उपस्थितीत होते.या उपक्रमास उद्योजक रवि गोसावी, राणीसाहेब क्रिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले.
युवा स्पंदनच्या अध्यक्षा प्रियांका धोत्रे यांच्यासह आकांक्षा वळे, महेश महाजन, अथर्व व सार्थक वीरशैव, आदित्य पावडे, यशराज नरवडे श्रेयस म्हस्के, आर्यन टोपे, अमोल भोराडे, अखिल कऱ्हाडे, सूरज कोकाटे, ईशान व अदिती कुऱ्हे,दुर्वा ढेपे, ऋषिकेश कोंगे, राजवर्धन गवळी, श्रुती रोकडे , सोनल श्रीमंगले आदींनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.आकांक्षा वळे यांनी केले सूत्रसंचालन तर यशराज नरवडे यांनी आभार मानले.