शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर:शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे ॲड.अशोक पवार यांच्या विरोधात महायुतीने घड्याळ चिन्हावर माऊली कटके यांना उमेदवारी दिली असून विजयाचे प्रबळ दावेदार समजले जाणाऱ्या पवार यांना पराभूत करून कटके जायंट किलर ठरणार का?हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या निधनानंतर आता पवार यांच्या विरोधात शिरूर हवेली मतदारसंघात सक्षम उमेदवार राहिलाच नाही.असे गेली काही महिन्यांपासून ऐकावयास मिळत आहे. अनेक जाणकारांचेही तेच मत आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अधक्ष प्रदीप कंद हे राष्ट्रवादीच्या वतीने उमेदवार साठी इच्छुक होते.मात्र पवार यांनाच राष्ट्रवादीने उमेदवारी दिली.कटके हे त्यावेळी पवारांच्या विरोधी गटात होते.त्यावेळी पवार हे मोठ्या मताधिक्याने निवडूनही आले. या निवडणुकीनंतर अनेक घडामोडी घडल्या जसं की,राष्ट्रवादी व शिवसेने मध्ये फूट पडली.राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर पवार यांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी या विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार ॲड.पवार हेच असतील हे निश्चित झाले होते.राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाल्यानंतर देखील पवार यांच्या विरोधात कंद यांचीच उमेदवारी असेल.अशी शक्यता वर्तवली जात होती.गेल्या एक ते दीड वर्षापासूनची परिस्थिती पाहता कंद हे हवे तितके मतदारसंघात ॲक्टिव्ह झाल्याचे दिसले नाही.यातच गेल्या काही महिन्यांमध्ये शिरूर हवेली मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार असणार.अशा चर्चांना ऊत आला.
एकीकडे अशा प्रकारच्या चर्चा घडत असताना कुठल्याही प्रकारे उमेदवारीच्या चर्चेत नसलेला एक व्यक्ती मतदारसंघात ॲक्टिव्ह होऊ लागल्याचे दिसून आले. ती व्यक्ती म्हणजे माऊली कटके.मतदारसंघात विविध पदाधिकाऱ्यांच्या, युवकांच्या भेटी गाठी घेणे. मतदार संघातील नागरिकांना मोफत धार्मिक सहली घडवून आणणे.आदी गोष्टी त्यांच्या अव्याहतपणे सुरू होत्या.तरीही ही व्यक्ती मुख्य पक्षाचा उमेदवार असेल असे कोणालाही वाटले नव्हते. काही झाले तरी निवडणूक लढवायची याचा त्यांनी निर्धार केला होता. शिरुर हवेलीतील राष्ट्रवादीच्या प्रमुख तसेच दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना आपलंसं करण्यात प्रथम त्यांनी यश मिळवलं. या पदाधिकाऱ्यांनी त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे कटके यांची शिफारस केली.मोठ्या प्रयत्नानंतर अखेर कटके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळवली.वयाने आमदार पवार यांच्यापेक्षा २५ हून अधिक वर्ष लहान असणारे कटके पवार यांच्याशी दोन हात करणार आहेत.
विकास कामे,राजकीय रणनीती तसेच ‘अर्थपूर्ण’ नियोजन या त्रिसुत्रीमुळे आमदार पवार हे विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.मात्र कटके यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार कटके यांनी मतदारसंघात जिकरीने पेरणी करण्याचा प्रयत्न केला आहे.कटके यांनी पवार यांच्या सोबत काम केल्याने त्यांना त्याचे चांगले वाईट दोन्ही पैलू माहीत असणार.त्याचाही कटके यांना फायदा मिळू शकणार आहे.आमदार पवार यांना सोडून गेलेल्या मंडळींची साथ आता कटके यांना मिळणार आहे.आमदार पवार यांच्यावर टीका करणारे माजी आमदार सूर्यकांत पलांडे तसेच त्यांच्यासारखे पक्षातीलच इतर टीकाकार यांची भूमिकाही कशी राहते.हे देखील कटके यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते.समर्थकांच्या म्हणण्यानुसार कटके यांची एकूणच रणनीती यशस्वी ठरल्यास कटके हे नक्कीच जायंट किलर ठरतील.
सरकारने लाडकी बहीण योजनेस विविध लोकप्रिय योजनांचा पाऊस पाडला आहे.मात्र गेली अनेक महिन्यांपासून मतदारसंघातील नागरिकांना धार्मिक सहली घडवल्याने कटके हे शेतकरी,ज्येष्ठ नागरिक,महिला,युवक,युवती या सर्वांचेच ‘लाडके ‘ बनले आहेत. मतदार संघातील लाडक्या बहिणींना शासनाकडून महिन्याला दीड हजार तर मिळालेच. याबरोबरच कटके यांच्या मोफत धार्मिक सहलीचाही लाभ त्यांना मिळाला आहे. यामुळे या बहिणींची या निवडणुकीत काय भूमिका राहते हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. शिरूर हवेली मतदारसंघात एकीकडे महाविकासआघाडीचा मोठा गाजावाजा असताना विरोधकांमध्ये अद्यापही शांतता दिसत आहे.ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना?