शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर: शिरूर हवेली विधानसभा मतदार सघातम हाआघाडीच्या उमेदवाराचा प्रचाराचा जवळजवळ दुसरा टप्पा पूर्ण होत असताना महायुतीने मात्र आपला उमेदवार अद्यापही घोषित न केल्याने सध्या तरी महायुती बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर शिरूर हवेलीचे सध्याचे आमदार ॲड.अशोक पवार यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहण्याचा निर्णय घेतला.पवारांसोबत राहिलेले जिल्ह्यातील ते एकमेव आमदार आहेत.ॲड.पवार यांचा शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात चांगला प्रभाव असून पुन्हा त्यांना उमेदवारी मिळणार हे सुरुवातीपासून स्पष्ट आहे.मागील निवडणुकीत पवार यांनी बाबुराव पाचर्णे यांचा ४० हजारहून अधिक मतांनी पराभव केला होता. मागील वर्षी पाचर्णे यांचे निधन झाले.यामुळे पवार यांना आता शिरूर हवेली मतदारसंघात तगडा स्पर्धकच उरला नाही.असेच चित्र निर्माण झाले. खुद्द पवार यांनीही आता माझ्यासमोर पाचर्णे यांच्या तोडीचा उमेदवार नाही असे बोलून दाखवले आहे.यातच पवार हे गेल्या काही महिन्यांपासूनच कामाला लागल्याचे चित्र आहे.या दरम्यान त्यांनी विविध विकास कामांना मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. महायुती गेल्या काही महिन्यांपासून पवार यांच्यासमोर नेमका कोणता उमेदवार द्यावा याची चाचपणी करीत आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या वतीने उमेदवारीसाठी दावा केला होता. मात्र त्यावेळी त्यांना डावलून अशोक पवार यांना उमेदवारी देण्यात आली.त्यानंतर कंद यांनी भाजपाशी घरोबा केला.राष्ट्रवादी काँग्रेस आज एकसंध असती आणि कंद भाजपात गेले नसतेतर कदाचित कंद हे राष्ट्रवादीचे उमेदवार असते.मात्र कंद सध्या भाजापात असून राष्ट्रवादीचे विभाजन झाल्यानंतर ॲड.पवार यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत ॲड.पवार यांच्या विरोधात महायुतीच्या वतीने कंद हेच भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना पासून ते आजपर्यंतची परिस्थिती पाहता कंद हे या मतदारसंघात फारसे सक्रिय झाल्याचे कधी दिसलेच नाही.याचा परिणाम व ॲड.पवार यांच्या कामाची पद्धत पाहता त्यांच्या समोर कोणीच टिकणार नाही.असेच वातावरण गेल्या अनेक महिन्यांपासून निर्माण झाले आहे.याची कदाचित महायुतीला कल्पना असेल.म्हणून की काय महायुतीने अद्याप त्यांचा उमेदवार या मतदारसंघात जाहीर केलेला नाही.
निवडणुकीचे नियोजनामध्ये ॲड.पवार हे मातब्बर आहेत.हे त्यांचे विरोधकही खासगीत कबूल करतात.अशात त्यांनी गेली अनेक महिन्यांपासून निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे वास्तव आहे. मतदारसंघात संपर्क अभियान असो अथवा विकास कामांना मूर्त स्वरूप देण्याचे काम असो ते कुठेच मागे पडल्याचे दिसले नाही.मागील वर्षी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला. यामुळे विरोधकांना आमदार पवार यांना घेरण्याची चांगली संधी मिळाली होती.मात्र मांडवगण फराटा येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखाना आमच्या शिवाय कोणी सुरू करू शकत नाही अशा स्वरूपाचे विधान केल्याने यामुळे आमदार पवार यांच्या विषयीचा रोष कमी झाला.विरोधकांची धार कमी झाली.एकूणच आतापर्यंतची परिस्थिती पाहता आमदार पवार यांना अनुकूल अशीच परिस्थिती निर्माण होताना दिसली.एकूणच गेल्या वर्षभरात विरोधकांना आमदार पवार यांच्या विरोधात वातावरण तयार करण्यात अपेक्षित यश आले नाही.एकाअर्थाने विरोधकांना माजी आमदार पाचर्णे यांची उणीव भासली.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.खरंतर गेल्या पाच वर्षात (माजी आमदार पाचर्ण यांच्या निधनानंतर) विरोधकांना आपली ताकद निर्माण करण्यासाठी चांगली सधी होती.मात्र पाचर्णे यांच्यासारखी लोकप्रियता तसेच क्षमता नसल्याने विरोधक पहिल्यापासून ते आजपर्यंत बॅकफूटवरच राहिले.विरोधकांनी याचे आत्मपरीक्षण केल्यास त्यांना याची निश्चितच जाणीव होईल.
आमदार पवारांना घेण्यासाठी मुद्दे नाहीत का? तर आहेत….
कारखाना बंद पडण्यास महायुती कारणीभूत असल्याचे आमदार पवार सांगत आहेत.मात्र नुकतेच प्रादेशिक सहसंचालकाने कारखान्याच्या लेखापरीक्षणावर आक्षेप घेतले आहेत.तसेच शेतकरी व सभासदांची दिशाभूल केल्याचे म्हटले आहे. अधिकाराचा गैरवापर व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवला आहे. याबाबत कारखान्याचे म्हणणे मागितले आहे.यात खोलात गेल्यास आमदार पवार यांना विरोधक अडचणीत आणू शकतात.करडे एमआयडीसीत मुलाचा वाढता हस्तक्षेप,विविध विकासकामांत मध्ये राबविलेली टेंडर प्रक्रिया, नातेवाईक व जवळच्या व्यक्तींनाच कामे देण्यास प्राधान्य,खुनशी प्रवृत्ती आदी मुद्द्यांवर त्यांच्यावर टीका होत असते.हे मुद्दे प्रभावीपणे उचलण्यात विरोधक यशस्वी ठरल्यास आमदार पवार अडचणीत येऊ शकतात. मागील पाच वर्षात अनेक मोठे पदाधिकारी त्यांना सोडून गेलेले आहेत.यांची मोट बांधून विरोधक आपल्या उमेदवारासाठी यांचा फायदा करून घेऊ शकतात.अर्थात हे सर्व करण्याची वेळ निघून गेली आहे.असेच दिसत आहे.