शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: शिरूरकरांनी धारीवाल कुटुंबियांवर नेहमीच प्रेम केले असून शिरूरकरांचे हे ऋण धारिवाल कुटुंबीय कधीही फेडू शकणार नाही.असे भावोद्गार प्रकाशभाऊ धारीवाल यांनी काढले.देशाचे थोर उद्योगपती रसिकलाल धारीवाल यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त आयोजित महारक्तदान शिबिरात रक्तदानासाठी शिरूरकरांनी दिलेला प्रतिसाद पाहून प्रकाशभाऊ भावनावश झाले. ११०० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
आपल्या दातृत्वामुळे देशभरात प्रसिद्ध असलेल्या रसिकभाऊ यांच्याप्रती शिरूरकरांच्या मनात प्रचंड आदर भावना असून रसिकभाऊ हयात असल्यापासून त्यांच्या जन्मदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे.त्यांच्या मृत्यूपश्चातही शिबिराची परंपरा अखंडित असून प्रकाशभाऊ मित्र मंडळाच्या (शहर व पंचक्रोशी)वतीने या शिबिराचे आयोजन केले जात आहे.आजच्या रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली.शिबिराच्या समारोपा प्रसंगीही गर्दी होती.वेळेअभावी रक्तदात्यांची इच्छा असूनही शिबिर आटोपते घ्यावे लागले.आज सकाळी प्रकशभाऊ धारीवाल,त्यांच्या सौभाग्यवती दिनाभाभी धारीवाल व मुलगा आदित्य धारीवाल यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.सकाळपासूनच रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.यात महिलांची संख्या लक्षणीय होती.प्रत्येक रक्तदात्याला सद्भावनेतून भेटवस्तू तसेच प्रशस्तीपत्रक देण्यात आले.प्रकाशभाऊ यांच्याप्रती शिरूरकरांची असलेली आस्था पाहता बहुतांशी रक्तदाते रक्तदान करताना त्यांच्यासोबत छबी टिपण्यासाठी आतुर असल्याचे निदर्शनास आले.लकी ड्रॉच्या माध्यमातून ८५ भाग्यवान विजेत्यांची नावे माजी नगरसेवक विजय दुगड यांनी यावेळी जाहीर केली.आज केवळ या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली.७ मार्च रोजी प्रकाश धारीवाल यांचा वाढदिवस असून त्यादिवशी या विजेत्यांना सायकलचे वाटप करण्यात येणार आहे.आज ११०० रक्त बाटल्यांचे संकलन झाले.पुढील वर्षी १५०० रक्त बाटल्यांचे संकलन करण्याचा निर्धार दुगड यांनी यावेळी व्यक्त केला.त्याला उपस्थितांनीही दाद दिली.
अहमदनगर येथील अर्पण, आनंदऋषीजी व पुणे येथील के.ई.एम. या रक्तपेढी समूहाने रक्त संकलन केले.’ रक्ताचे नाते ‘ ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड यांचे विशेष सहकार्य लाभले.
एका कुटुंबाची रक्तदानाची आदर्शवत परंपरा
निलेश खाबिया यांनी या शिबिरात ६८ वे रक्तदान केले. त्यांची पत्नी वैशाली यांचे १५ वे,मुलगा मित याचे १० वे तर पुतण्या नमोल याचे १२ वे रक्तदान होते.