वात्सल्यसिंधू फाउंडेशनच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद  

२३८ मूर्तींचे संकलन

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर: वात्सल्यसिंधू फाउंडेशनने सुरू केलेल्या
पर्यावरण पूरक गणेशोत्सव उपक्रमास शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धन चळवळीस चालना मिळत असल्याचे समाधान आहे.अशी प्रतिक्रिया वास्तल्यसिंधू फाउंडेशनच्या सुनंदा लंघे व उषा वाखारे यांनी दिली.यावर्षी २३८ गणेशमूर्तीचे संकलन झाले.
         वात्सल्यसिंधू फाउंडेशन सामाजिक भावनेतून विविध सामाजिक उपक्रम राबवित असून चार वर्षापूर्वी त्यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव उपक्रम सुरू केला.विसर्जन घाटाजवळ मंडप टाकून पर्यावरण संवर्धनासाठी मूर्तींचे नदीत विसर्जन करण्याऐवजी मूर्ती दान करा असे आवाहन करण्यास सुरुवात केली.सुरुवातीला काहीसा थंड प्रतिसाद मिळाला.मात्र पर्यावरणाचे महत्त्व समजनाऱ्यांनी मूर्ती दान करून या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.उपक्रमाचे चौथे वर्ष पाहता पर्यावरणाचे महत्त्व नागरिकांना पटू लागल्याचे चित्र असून मूर्ती दान करण्याचे प्रमाण वाढल्याचे आशादायी चित्र आहे.शिरूर नगरपरिषदेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत असून या वर्षी २३८ मूर्तींचे संकलन झाले आहे.नगरपरिषदेचे मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी वात्सल्यसिंधूच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे कौतुक केले.पर्यावरण पूरक गणेशोत्सव ही एक पर्यावरण संवर्धन चळवळ असून शिरूरकरांचे या चळवळीला बळ मिळत आहे.ही चळवळ संपूर्ण शिरूरकरांची चळवळ बनावी,अशी आमची अपेक्षा असून यात नक्की यश मिळेल असा विश्वास लंघे व वाखारे यांनी व्यक्त केला.
         दरम्यान मुख्याधिकारी काळे यांच्या उपस्थितीत मूर्ती संकलन सुरू झाले.आरोग्य निरीक्षक दत्तात्रय बर्गे, वात्सल्यसिंधू फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनंदा लंघे,सचिव उषा वाखारे यांच्यासह फाउंडेशनच्या पल्लवी शेगोर, मंगेश शेगोर,शैलेश वाखारे,शकीला शेख,सोनाली रायबोले,प्रिया केदारी,मनिषा टेंभेकर,माधुरी निगडे,मीना गवारे,अनुपमा दोषी,संगीता धोंगडे, नंदा खैरे,यांनी दिवसभर तेथे थांबून मूर्तींचे संकलन केले.या उपक्रमास विकास पोखरणा,संतोष सांभारे तसेच आदिशक्ती महिला मंडळाच्या सर्व मैत्रिणींचे विशेष सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.