ससूनमध्ये गरीब रुग्णांना मोफत औषधे – डॉ. सुजित दिव्हारे

हा निर्णय घेताना न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षकांचे संस्कार आले कामी

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क 

शिरूर: रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलने सर्वसामान्यांशी तसेच मातीशी नाळ जोडण्याचे जे संस्कार दिले त्या संस्कारामुळे तसेच कर्मवीर अण्णांच्या विचारांच्या प्रेरणेमुळे मी आज ससून रुग्णालयाचा डीन म्हणून कार्यरत असून गरीब रुग्णांना संपूर्ण मोफत औषधे देण्याच्या धाडसी निर्णय घेतल्याचे डॉ.सुजित दिव्हारे यांनी येथे सांगितले.

        पद्मभूषण कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून दिव्हारे बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जाकीरखान पठाण हे अध्यक्षस्थानी होते. रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, सोलापूर विद्यापीठाचे डीन शंकर नवले,रयत सेवक को-ऑपरेटिव बँकेचे संचालक प्रशांत खामकर यांची प्रमुख उपस्थिती होती.स्कूल कमिटी सदस्य डॉ. राहुल घावटे,निलेश खाबीया,सल्लागार सी.पी.बोरा,नामदेवराव घावटे, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रेश्मा शेख,उपमुख्याध्यापक एम टी काळे,संजय शितोळे,माजी मुख्याध्यापक,शिक्षक यावेळी उपस्थित होते. दिव्हारे म्हणाले,कर्मवीर अण्णांमुळे गरिबांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकली.मीही त्यापैकी एक आहे.आज ज्या ससून रुग्णालयाचे मी नेतृत्व करीत आहे त्या रुग्णालयातही गरीब रुग्ण असतात.गरिबीची जाण असल्याने डीन म्हणून रुजू झाल्यावर गरीब रुग्णांना ताप थंडी पासून ते असाध्य कॅन्सर पर्यंत लागणारी औषधे मोफत देण्याचा धाडसी निर्णय घेतला.रुजू होण्याआधी २०२२ जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत औषधासाठी ५५ लाख रुपये खर्च झाले होते.रुजू झाल्यावर २०२३ जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत ३ कोटी पाच रूपांची औषधे खरेदी केल्याचे दिव्हारे यांनी अभिमानाने सांगितले.शाळेने मनात रुजवलेला प्रामाणिकपणा व दिलेल्या संस्कारामुळे हे सर्व करू शकल्याचे दिव्हारे म्हणाले.
         जाकिरखान पठाण म्हणाले,स्वातंत्र्यपूर्व काळात कुठलेही शैक्षणिक धोरण नसताना १९१९ साली कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेड रोवली.आज त्याचा वटवृक्ष झाला असून सर्वसामान्यांना याचा फायदा होताना दिसत आहे.या सर्वसामान्यांच्या योगदानातून ही संस्था उभी राहिली असून शाळेचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी हेच या संस्थेचे मालक आहेत. सर्वसामान्यांच्या या संस्थेचा पदाधिकारी असल्याचा सार्थ अभिमान असल्याचेही पठाण म्हणाले.रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक दरमहा आपल्या पगारातील एक टक्का रक्कम संस्थेसाठी कृतज्ञता निधी म्हणून देत आहेत.अशाप्रकारे कृतज्ञता व्यक्त होत असलेली आशिया खंडातील रयत शिक्षण संस्था ही एकमेव संस्था असल्याचे पठाण यांनी सांगितले.नवले,खामकर यांनी आपले विचार मांडले.शाळेचे मुख्याध्यापक एस एच मचाले यांनी स्वागत,एन एस पठारे यांनी सूत्रसंचालन तर पर्यवेक्षक के एन जगदाळे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.