यंत्रणेचा निष्काळजीपणा ठरतोय का अपघातांना कारणीभूत?
अठरा वर्षानंतरही शिरूर पुणे रस्त्यावरील असुविधा कायम
शिरूर:शिरूर पुणे रस्ता तयार होऊन अठरा वर्ष झाली.मात्र सुरुवातीलाही हा रस्ता शतप्रतिशत सुरक्षित नव्हता आणि आजही नाही.वाहनधारकांनीही जणू होणारा त्रास स्वीकारला असून शासनालाही त्याचे गांभीर्य नाही हेच वेळोवेळी दिसून आले आहे.असुविधेमुळे होणारे अपघात टाळायचे असतील तर शासनाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
शिरूर पुणे हा ५५ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण होऊन या रस्त्यावर २००५ सालापासून टोल वसुली सुरू झाली.अहमदनगर येथील प्रमोद मोहोळे यांनी या रस्त्याच्या संदर्भात जनहित याचिका दाखल केली होती.त्यांनी त्यावेळी निदर्शनास आणलेल्या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या.रस्ता तयार करणाऱ्या अशोक बिल्डकॉन या कंपनीशी शासनाचा जो करार झाला होता.त्या करारातील अनेक गोष्टींचा विचार रस्ता तयार करताना केला गेला नाही.असा त्यांनी आरोप केला होता.रस्ता तयार झाल्यानंतर अल्पावधीतच रस्त्यावरील दुभाजकाची दुरावस्था झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले होते.या दुभाजाकाची उंची अपेक्षेप्रमाणे नव्हती.दुभाजक तयार करताना त्यावर लाईट कटर बसवणे अपेक्षित होते.मात्र कंपनीने ते बसवले नाही.दुभजाकाची कमी उंची व लाईट कटर नसल्याने अनेक अपघात झाले.रस्ता तयार झाल्यानंतर काही वर्षांनी दुभाजकाची काही प्रमाणात उंची वाढवून त्यावर फायबरचे लाईट कटर बसवण्यात आले.मात्र तीन ते पाच वर्षांतच हे लाईट कटर गायब झाले.म्हणजेच १८ वर्षानंतरही लाईट कटरची समस्या कायम आहे.वाहनधारक आजही जीव धोक्यात घालून वाहने चालवतानाचे चित्र आहे.लाईट कटरच्या समस्येमुळे अपघाताचे सत्र सुरूच आहे.
या रस्त्यावरील टोलवसुली २०१५ साली बंद होऊन हा रस्ता शासनाच्या अखत्यारीत आला.आता तर तो राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत आला आहे.रस्ता तयार करणाऱ्या कंपनीनेही करारानुसार उपरोक्त नमूद गोष्टी वेळेत केल्या नाही.केल्यानंतरही त्या टिकल्या नाहीत.करार संपल्यावर शासनाने याकडे लक्ष द्यायला हवे होते.मात्र त्यांनीही हवे तितके गांभीर्याने घेतले नाही.सध्या दुभाजाकाबरोबरच लाईट कटरची समस्या तर आहेच मात्र रस्त्यावर बहुतांशी ठिकाणी पांढरे पट्टे ( जे दोन्ही बाजूला मध्यभागी व दुभाजकला लागून असायला हवे असतात) अस्पष्ट झाले आहेत.यामुळे वाहन चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागते.रात्रीच्या वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांची प्रखर लाईट डोळ्यावर पडल्यावर चालकास दुभाजक दिसत नाही.तसेच मधील पट्टाही दिसत नसल्याने अडचण निर्माण होत आहे.या समस्येमुळे अपघात होत आहेत.रस्ता तयार होऊन अठरा वर्षानंतरही हा रस्ता वाहनचालकांसाठी सुरक्षित नाही.असेच वास्तव आहे राष्ट्रीय महामार्ग असल्याने भविष्यात तो चांगला केला जाईल तेव्हा जाईल.मात्र तोपर्यंत या समस्यांना वाहाचालकांनी सामोरे जायचे का ?हा प्रश्न आहे.शासनाने तूर्त दुभाजक सुस्थितीत आणून त्यावर लाईट कटर बसवून तसेच पांढरे पट्टे मारून (ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथे)अपघात रोखण्यासाठी पावले उचलावीत अशी वाहनचालकांची अपेक्षा आहे.
काही भाग वगळता शिक्रापूर पर्यंत या रस्त्यावरील एक लेन वाढवण्यात आली आहे.मात्र या रस्त्यावरही पांढरे अस्पष्ट पट्टे व लाईट कटरची समस्या आहे.