वाबळेवाडी शाळेत गैरव्यवहारच- आमदार अशोक पवार

२५ हजार रुपये फी भरण्याची सर्वसामान्यांची ऐपत असते का? आमदार पवारांचा सवाल

0

प्रवीण गायकवाड

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

 शिरूर:जिल्हापरिषद शाळांमध्ये सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षण घेतात.मी देखील जि प शाळेतच शिकलो.आम्हाला सातवीपर्यंत एक रुपयाही खर्च आला नाही.वाबळे वाडीच्या शाळेने मात्र प्रवेशासाठी २५ ते ३५ हजार रुपये घेतले व त्याचा हिशोबही जिल्हा परिषदेला दिला नाही.हा गैरव्यवहारच असून आपण त्याच्या चौकशीची मागणी करण्यात गैर काय आहे असा प्रश्न आमदार अशोक पवार यांनी केला.

           आमदार पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भुमिका मांडली.पवार म्हणाले,वाबळे वाडीच्या शाळेचे मी विधासभेत गुणगान गायले आहे.या शाळेचा पॅटर्न राज्यभर राबवण्याची मागणीही केली होती. मात्र या शाळेत प्रवेशा साठी २५ ते ३५ हजार रुपये घेतात हे समजले.काहींनी याबाबतच्या पावत्याही दाखविल्या.हे पाहून आश्चर्य वाटले.एका पालकाने,या शाळेत प्रवेशासाठी दोन वर्ष प्रयत्न करूनही प्रवेश दिला नसल्याचे निदर्शनास आणले.शाळेत वाडी परिसरातील केवळ १५ ते २० टक्केच विद्यार्थी असून फी भरण्याची आर्थिक क्षमता असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रवेश देण्यात आल्याचेही निदर्शनास आले. याबाबत विस्तृत माहिती घेऊन तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यास या प्रकाराची चौकशी करण्यास सांगितले.अधिकारी शाळेत चौकशीसाठी गेले असता,शाळेने असे कोणतेही प्रकार शाळेत घडत नसल्याचे अधिकाऱ्यास सांगितले.अधिकाऱ्याने खडसावल्यावर पावती पुस्तक दाखवण्यात आले.हा काय प्रकार आहे असा प्रश्न केला असता,शाळेला उत्तर देता आले नाही.यानंतर शाळेची प्रशासन स्तरावर चौकशी सुरू झाली.तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्यावर कर्तव्यात कसूर,पदाचा दुरुपयोग,शालेय व प्रशासकीय कामकाजामध्ये अनियमितता व निष्काळीजपणा करणे आदी प्रकारचा ठपका ठेवून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली.
             या शाळेची दोन वर्ष चौकशी सुरु असताना तत्कालीन शिक्षण सचिव यांनी खालच्या अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आणला.आयुष प्रसाद यांनी मात्र दबाव जुगारून ठपका ठेवला.मुळात या शाळेच्या चौकशीसाठी नियुक्त समिती दिड महिन्याने शाळेवर गेली.यामुळे शाळेला पुरावे नष्ट करण्यास वेळ मिळाल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.मुख्याध्यापक वारे यांनी सहानभुती मिळवण्यासाठी मीडिया समोर एकच बाजू मांडल्याचा आरोप आमदारांनी केला.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने.गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवला.मात्र दोन वर्ष होऊनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने अधिवेशनात मुद्दा मांडल्याचे पवार यांनी सांगितले.माझी मागणी रास्त असतानाही महिला भगिनींना पुढे करून माझ्या विरोधात ही मंडळी बोलायला भाग पाडत आहेत.पालकांवरही दबाव टाकून त्यांना आंदोलनात सहभागी करून घेतले जात असल्याचे आमदार पवार म्हणाले.मुळात आंदोलन करणाऱ्यांपैकी दोघेजण पैसे गोळा करणारे आहेत.या शाळेत ठराविक लोकांचा मनमानी कारभार समोर आला आहे.उदाहरणदाखल,एका शिक्षिकेने ऑनलाईन बदलीसाठी अर्ज केला होता.यात वाबळेवाडीच्या शाळेत त्यांची बदली झाली.शाळेने मात्र त्यांना सहा महिने रुजू करूनच घेतले नाही.अखेर त्या शिक्षिकेला शाळा बदलावी लागली.दरम्यान पत्रकार परिषदेत उपस्थित असणाऱ्या वाबळेवाडी शालेय समितीचे सदस्य काळूराम वाबळे यांनी ६० टक्के लोक आमदारांच्या भूमिकेबरोबर असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.