साहेब,जे म्हटलात ते शिरूरकरांना करून दाखवाच..

शिरूरकरांचे साहेबांना आवाहन

0

प्रवीण गायकवाड

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:पदभार स्वीकारला की पत्रकारांशी संवाद साधायचा…अमुक करू,तमुक करू असा शिरूरकरांना विश्वास द्यायचा आणि काही दिवसातच विसरून जायचे.अलीकडच्या काही वर्षातील शिरूर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांच्या बाबतीतील हा अनुभव.नुकताच नवीन अधिकाऱ्याने पदभार स्वीकारला आहे.त्यांनीही पत्रकारांशी संवाद साधून कारवाईत सातत्य राहणार असल्याचे सांगितले आहे.साहेब,शिरूरकरांचे आपल्याला आवाहन आहे.म्हटलात ते करून दाखवाच.

         वाहतूक खोळंबा,महिला सुरक्षा,रोड रोमियोंचा उच्छाद,दामिनी पथक,११२ ची सेवा,अवैध धंद्यांचा सुळसुळाट,पोलिस ठाण्यात तक्रारदारांना मिळणारी वागणूक या मुख्य समस्या आहेत.दयानंद गावडे हे या ठाण्यात निरीक्षक पदी असताना त्यांनी वाहतूक समस्या सोडवण्यासाठी वाहतूक समितीची स्थापना केली होती.याचा फार फायदा झाला असे नाही.मात्र त्यांनी समस्या सोडवण्याची मानसिकता तरी दाखवली.त्यांच्यानंतर आलेल्या कोणत्याच अधिकाऱ्याने वाहतूक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला शिरूरकरांना दिसला नाही.शहरात पार्किंगची सुविधा नाही.परिणामी कुठेही कशाही प्रकारे वाहने लावली जातात.यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.वाढत्या वाहनांमुळे समस्येत भर पडत जाणार.हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही.विद्याधाम प्रशालेसमोरून जाणाऱ्या पुणे नगर रस्त्यावर शाळा भरताना तसेच सुटताना प्रचंड वाहतूक कोंडी होते.याचे कारण पाल्यांना नेण्याआणण्या करीता बहुतेक पालक हे दुचाकी अथवा चारचाकी वाहने आणतात.रोडच्या कडेला कशाही पद्धतीने लावतात.यातच पुणे नगर रस्त्यावरून रेग्यूलर जाणारी वाहनेही असतात.यामुळे त्या कालावधीत वाहतुकीचा खोळंबा नित्याचाच बनला आहे.अशीच परिस्थिती आर एम डी स्कूल समोरील रस्त्यावर अनुभवयास मिळते.निर्माण प्लाझा चौकातही अनेकदा वाहतूक खोळंबा पहावयास मिळतो.निर्माण प्लाझा चौक ते मार्केट यार्ड रस्त्यावर देखील बेशिस्त पार्कींगमुळे वाहतुकीची समस्या दिसून येते.शाळा महाविद्यालये भरताना व सुटताना काही वेळेसाठी वाहतूक पोलिस तेथे तैनात करावा.अशी नागरिकांची मागणी नित्याचीच आहे.मागील काही वर्षांपासून या मागणीकडे शिरूर पोलिस गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे.
         रोड रोमियोंच्या बाबतीत पोलीस निरीक्षक गावडे यांच्यासह नारायण सारंगकर यांनी कडक बंदोबस्त केला होता.दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली होती.यासाठी दोन दुचाकीवर दोन महिला कर्मचारीही नियुक्त करण्यात आल्या होत्या.महाविद्यालयात दररोज त्यांची पेट्रोलिंग असायची.मात्र काही महिन्यातच हे पथक गायब झाले.दामिनी पथकाच्या पेट्रोलिंग मुळे मुलींना चांगला आधार मिळाला होता.शिरूर मधील शाळा महाविद्यालयात शिरूरसह श्रीगोंदा,पारनेर तालुक्यातील विद्यार्थिनी येतात.एस टी बस स्थानकापासून महाविद्यालय,शाळा ते पुन्हा बस स्टँड कडे जाताना य मुलींना अनेकदा टिंगल टवाळीला सामोरे जावे लागते.बस स्थानकावर बसची वाट पाहत बसलेल्या असतानाही हा त्रास मुलींना सहन करावा लागतो.याचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे.आजमितीला दामिनी पथक कार्यरत असल्याचे दिसत नाही.अवैध धंदे मात्र कोणत्याच अधिकाऱ्याच्या कालावधीत कायमचे बंद होत नाहीत.११२ हा क्रमांक डायल केल्यास पोलिस त्वरित तक्रार केलेल्या ठिकाणावर पोहचतात.मात्र काही विचित्र अनुभव अनेकांना आले आहेत.एका ज्येष्ठ महिलेने या क्रमांकावर संपर्क साधला.मात्र तिथे पोहचल्यावर जिने तक्रार केली.त्या ज्येष्ठ महीलेलाच त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.येथील,देशात विख्यात असलेले नेत्रतज्ञ डॉ.स्वप्नील भालेकर यांनाही या क्रमांकाचा नकारात्मक अनुभव आला आहे.या पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास गेलेल्या तक्रारदारास व्यवस्थित वागणूक दिली जात नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत.नव्याने पदभार स्वीकारलेल्या अधिकाऱ्याने पदभार स्वीकारताच शहरात पेट्रोलिंग सुरू केले.महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांवर विविध प्रकारची कारवाई केली.(याला रोड रोमियोवरची कारवाई म्हणता येणार नाही.)या गोष्टी आश्वासक वाटत आहे.मात्र ११२ क्रमांक सेवा,अवैध धंदे,दामिनी पथक,महिला सुरक्षा,तक्रारदारांना मिळणारी वागणूक याबाबत नवे अधिकारी काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.