शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर:एकीकडे छगन भुजबळ म्हणताहेत पवार साहेब आमचे गुरू आहेत.तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पवार साहेबच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे सांगत आहेत.पवार साहेब देखील बंडाबाबत हवी तेवढी कडक भूमिका घेताना दिसत नाही.एकूणच कालपासून घडत असणाऱ्या घडामोडी कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणाऱ्या दिसत आहेत.
अजित पवार पक्षाशी बंड करतात.भाजपशी हातमिळवणी करून ते उपमुख्यमंत्री तर इतर आठ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतात.या मंत्र्यांमध्ये छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील व इतर या पवार साहेबांच्या फार जवळच्या मंडळींचा समावेश असतो.अत्यंत जवळचे प्रफुल्ल पटेलही अजित पवार यांच्या समवेत जातात.हे अजूनही अनेकांच्या पचनी पडत नाही.काल पवार साहेब पत्रकार परिषद घेतात.पत्रकार त्यांना विचारतात अजितदादा,पटेल यांच्यावर काय कारवाई करणार? पवारसाहेब यावर उत्तर देतात,आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ.सुप्रियाताई देखील भावाच्या बंडावर हव्या तितक्या नाराज दिसत नाही.पटेल यांनी जयंत पाटील यांना हटवून आज सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली.इतरही बदल केले.यावर तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असा पत्रकाराने प्रश्न केला यावर अजित दादांचे पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहेत माहीत नाही का?असे उत्तर येते.यानंतर पटेल म्हणतात,पवारसाहेब आमचे गुरू आहेत.भुजबळ ही म्हणतात,आज गुरूपौर्णिमा आहे.साहेब आमचे गुरू आहेत.अजित दादांना उपमुख्यमंत्री करून साहेबांना गुरुदक्षिणा देखील दिली आहे.
एकीकडे हे नेते पवार साहेबांविषयी आदर दाखवत आहेत.तर दुसरीकडे पक्ष कोणाचा आहे.हे निवडणूक आयोग ठरवेल.असे अजित दादांनी म्हटले आहे.सुप्रिया सुळे व जयंत पाटील यांनी अजित दादांबरोबर गेलेल्या आमदारांना नोटीस पाठवून ५ जुलैचा अल्टिमेटम दिला आहे.या बरोबरच आज दोन्ही बाजूने अनेक घडामोडी घडल्याचे चित्र आहे.या सर्व घडामोडी मात्र कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढवणाऱ्या आहेत.येथून पुढेही अशा संभ्रमावस्थेत टाकणाऱ्या घडामोडी घडत राहतील.या घडामोडी निमूटपणे पाहण्या पलीकडे कार्यकर्त्यांना काही करता येणार नाही.