जे काही बंड झाले त्याचे श्रेय पंतप्रधान मोदींना

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

प्रवीण गायकवाड
शिरूर:ज्या पक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी म्हणून संबोधित होते त्या पक्षातील आमदारांना मंत्रीपद देऊन त्यांना भ्रष्टाचारमुक्त करण्याचे मोलाचे काम मोदी यांनी केले असून राष्ट्रवादीमध्ये जे काही बंड झाले त्याचे श्रेय मोदींना जाते.असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
         राष्ट्रवादीमध्ये महाभूकंप होऊन पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सह नऊ जणांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. पक्षातील या नाट्यमय घडामोडीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना पवार म्हणाले,पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादीतील भ्रष्टाचार संदर्भात वक्तव्य केले होते त्यामुळे आमच्या पक्षातील काही लोक अस्वस्थ होते.खुद्द पंतप्रधान यांनीच हे वक्तव्य केल्याने त्यांच्यातील अस्वस्थता वाढली होती. आज याच मंडळींना मंत्रिपद देऊन पंतप्रधान मोदी यांनी त्यांना भ्रष्टाचार मुक्त केले आहे. यावेळी त्यांनी ईडीच्या चौकशीची कोणा कोणाला भीती आहे.त्यांची नावेच जाहीर केली. अजित पवार, छगन भुजबळ,हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांचा पवार यांनी उल्लेख केला.माझ्या या सहकाऱ्यांना भ्रष्टाचारातून मुक्त करण्याची मोलाची भूमिका पंतप्रधान मोदी यांनी केल्याने या बंडाचे श्रेय यांनाच जाते.असे पवार म्हणाले.
१९८० ची पुनरावृत्ती करणार
पवार म्हणाले,१९८० सली मी विरोधी पक्षनेता होतो. माझ्याकडे ५८ आमदार होते. त्यावेळीही आज प्रमाणे बंद करून ५८ पैकी ५२ जण पक्ष सोडून गेले होते. माझ्यासोबत केवळ पाच आमदार होते.अशावेळी मी चिंता न करता पक्ष बांधणीसाठी बाहेर पडलो. महाराष्ट्रभर फिरून जनतेशी संवाद साधला.त्याचा परिणाम त्यानंतरच्या निवडणुकीत आमच्या पक्षाचे ६९ आमदार निवडून आले तर जे सोडून गेले त्यापैकी केवळ तीन ते चारच जण निवडून आले. त्यामुळे मला हे काही नवीन नाही.१९८० साली चित्र निर्माण झाले होते.तेच चित्र जनतेच्या पाठिंब्यावर पुन्हा कसे निर्माण करता येईल तो आमचा प्रयत्न राहणार आहे.सर्वसामान्य जनतेवर,प्रामुख्याने तरुण पिढीवर प्रचंड विश्वास आहे.कसल्याही गोष्टीची चिंता न करता मी उद्या कऱ्हाड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन बाहेर पडणार आहे.जनतेशी जितका संपर्क वाढवता येईल तो वाढवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.
अनेक आमदार माझ्या संपर्कात
ज्यांनी बंड करणाऱ्यांसोबत जाऊन तिथे सह्या केल्या त्यापैकी अनेक जण माझ्या संपर्कात आहेत.या सर्वांनाच मतदारसंघ तसेच पक्षातील सहकारी व कार्यकर्त्यांची असलेले संबंध याबाबतची चिंता आहे.तिकडे गेल्यास सत्तेचा डाव होऊ शकेल,चार दोन काम होऊ शकतील तसेच निवडणुकांचे सहाय्य लागते.त्याची चिंता राहणार नाही.असे बंड करणाऱ्यांना वाटले असावे.मात्र या गोष्टीमुळे शतप्रतिशत यश मिळतेच असे नाही.शेवटी जनतेचा पाठिंबाच महत्त्वाचा असतो.याची चिंता अनेकांना असल्याने ते आमच्या संपर्कात असल्याचे पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.