आमदार पवार यांनी गंगावणे कुटुंबियांचे केले सांत्वन

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर: बुलढाणा येथील रुग्णालयात मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोहोचलेल्या गंगावणे परिवारातील सदस्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन आमदार अशोक पवार यांनी बुलढाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना केले. तुम्ही काळजी करू नका आम्ही सर्वतोपरी मदत करतो असे आश्वासन या सर्वांनीच दिले.

          समृद्धी महामार्गावर पिंपरखुटा ( जि.बुलढाणा) जवळ झालेल्या बसच्या भीषण अपघातात येथील शिक्षक कैलास बबनराव गंगावणे यांची पत्नी कांचन व मुलगी डॉक्टर ऋतुजा यांचा दुर्दैवी अंत झाला. आमदार पवार यांनी आज गंगावणे कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.यावेळी त्यांनी गंगावणे कुटुंबियांचे सांत्वन करतानाच माजी मंत्री राजेंद्र शिंगणे,आमदार संजय गायकवाड,राष्ट्रवादीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष नाझिर काझी तसेच बुलढाण्याचे झोनल आरटीओ प्रसाद गाजरे यांच्याशी फोनवर संपर्क साधला.मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बुलढाणा येथे आलेल्या कैलास गंगावणे यांचे बंधू सुरेश गंगावणे व त्यांच्या सहकाऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन आमदार पवार यांनी या सर्वांना केले.यातील प्रत्येकानेच आमदार पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.बहुतांशी जणांनी तात्काळ सुरेश गंगावणे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना दिलासा दिला.जी काही मदत लागेल ती करण्याचे आश्वासित केले.आमदार पवार यांनीही सुरेश यांच्याशी संपर्क साधला.काहीही अडचण असल्यास त्वरित संपर्क साधण्याचे सुचित केले. आमदार पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही थेट कॉल केला.त्यांचा संपर्क होऊ न शकल्याने त्यांनी पवारांच्या स्वीय सहाय्यकाशी संपर्क साधून गंगावणे कुटुंबीयांना मदत करण्यासंदर्भात आवाहन केले.आमदार पवार यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याशीही संपर्क साधला.बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून मदत करण्यास सांगा असे आवाहन केले.कैलास गंगावणे यांचे चुलत बंधू रुपेश गंगावणे,भाचे अमोल व अविनाश गंगावणे,शुभम गंगावणे आदी यावेळी उपस्थित होते.
समृध्दी महामार्गावर कुठेही वाहने थांबवता येत नाही.या महामार्गावर झालेले अपघात व त्यातून झालेले मृत्यू पाहता शंभर ते दीडशे किलोमीटर अंतरावर वाहनांना थोडी विश्रांती घेता येईल वाहन चालकांना थोडे रिलॅक्स होता येईल यासाठी शासनाने सुविधा उपलब्ध करायला हव्यात.यासाठी शासनाने शेतकऱ्यांकडून जागा भाड्याने घ्याव्यात.असे मत आमदार पवार यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.