शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर:तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे श्रेय माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनाच जाते.आता फक्त आपल्या नावाचे बोर्ड लावून श्रेय घेण्याचा प्रकार सुरू आहे.लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते त्यांना प्रशासनात हुशार,कार्यसम्राट अशी विशेषणे लावतात.ठीक आहे.त्यांनी स्वतः केलेल्या कामांचे श्रेय घ्यावे ना.असा टोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी आमदार अशोक पवार यांचे नाव न घेता लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने नऊ वर्षात केलेल्या कामगिरीची माहिती देण्यासाठी प्रदीप कंद यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.कंद यांनी मोदींच्या कामगिरीची माहिती दिली.पत्रकारांनी मोदी @ 9 या विषयीच प्रश्न विचारावे असे आवाहन केले.मात्र तरीही पत्रकारांनी शिरूर हवेली संदर्भात त्यांना प्रश्न केले.याबाबत बोलताना कंद यांनी माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या कामाची स्तुती केली. यावेळी त्यांनी काही कामांचा दाखला दिला. कंद म्हणाले,तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या रस्त्यांची आवश्यकता होती ते सर्व रस्ते पाचर्णे यांनी केले.पुणे शिरूर रस्त्याचा वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात माजी आमदार पाचर्णे यांनी सरकारकडे दोन लेन वाढवण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीनुसार २५० ते २७५ कोटी रुपये शासनाने मंजूर केले.या वाढीव दोन लेनचे बहुतांशी काम आता पूर्णत्वास आले आहे. त्याचवेळी पाचर्णे यांनी शिक्रापूर ते शिरूर या रस्त्याच्या दोन लेन वाढवणे संदर्भात देखील मागणी केली होती.त्या कामासाठीही ३२५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.दरम्यानच्या काळात शिरूर औरंगाबाद हा रस्ता नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या ताब्यात देण्यात आला.केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे ते शिरूर दुमजली रस्ता (सहा पदरी)त्यावर मेट्रो अशा प्रकल्पासाठी ७ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याच्या डीपीआर चे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी ही पाचर्णे यांनी पाठपुरावा केला होता.
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात अष्टविनायक रस्त्यांची कामेही पाचर्णे यांच्या कालावधीत झाली.न्हावरे ते चौफुला रस्त्यासाठी तीनशे कोटी रुपये मंजूर झाले.
कंद म्हणाले, मुख्यमंत्री सडक योजनेच्या मंजुरी प्रक्रियेत दोन आमदार,संबंधित अधिकारी, पालकमंत्र्यांची जिल्हा पातळीवरील कमिटी असते.या कमिटीकडे कामांची मागणी केली जाते. ही कामे मंजूर करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवली जातात.त्यानंतर अंतिम मंजुरी मिळते. शिरूर हवेली मतदारसंघात मात्र ही कामे आपणच केल्याच्या अविर्भावात रस्त्याच्या दोन्ही बाजूने,मध्यभागी बोर्ड लावण्याचा सपाटा सुरू असतो.अहो,मी म्हणतो,जे काम केले त्याच्या श्रेय घ्या ना.असा टोला कंद यांनी आमदार पवार यांचे नाव न घेता लगावला.हवेली मध्ये आमदार पवार हे पिंपरी सांडसचा पूल अकरा ते बारा महिन्यात पूर्ण केल्याचे सांगत असतात.ते २००९ ते २०१४ या कालावधीत आमदार असताना हा पूल तयार करण्यात आला.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे.पूल केला परंतु पुढे व पाठीमागे जो रस्ता करायला हवा होता.तो मात्र केला नाही. तीन वर्ष आम्ही त्या पुलाकडे पाहत होतो. २०१४ ला पाचर्णे आमदार झाल्यावर त्यांनी प्रयत्न करून तो रस्ता तयार केला.प्रशासनात हुशार, कार्यसम्राट असणाऱ्यांनी तो रस्ता वेळेतच पूर्ण करायला हवा होता असे कंद म्हणाले. मी जेव्हा जेव्हा तळेगाव ढमढेरे येथील बाजार तळ येथे जायचो तेव्हा तिथे रस्त्याची फार दुरावस्था होती.पाचर्णे आमदार झाल्यानंतर त्यांनी तो रस्ता केला.आता रस्ता चकचकीत दिसून येतो. असे कंद यांनी सांगितले.न्हावरे काष्टी रस्त्यावर दोन ठिकाणी रस्ता अडवण्यात आला आहे. वास्तविक या संदर्भात तेथील शेतकऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न केव्हाच मार्गी लागायला हवा होता.मात्र प्रश्न अद्याप आहे तसाच असल्याचे कंद म्हणाले.एकूणच पत्रकारांनी शिरूर हवेली मतदारसंघ संदर्भात केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मोह कंद यांना आवरता आला नाही.