शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर:विधानसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना भाजपा इच्छुक उमेदवारांच्या शिरूर भेटी वाढू लागल्या आहेत.अशातच विरोधी पक्षांच्या नेत्याचे आशीर्वाद मिळू लागल्याने विरोधी पक्षात चैतन्याचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. हे आशीर्वाद त्यांना किती तारतील हे मात्र निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे अशोक पवार हे आमदार असून आगामी विधानसभा निवडणुकीत तेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे.माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे निधन झाल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर पाचर्णे यांच्या सारखा सक्षम उमेदवार देण्याचे भाजपापुढे आव्हान आहे. वन मॅन आर्मी व लोकनेता म्हणून ओळख निर्माण केलेल्या पाचर्णे यांनी २००४ व २०१४ मध्ये भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली.दोन्ही वेळी त्यांनी राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या शिरूर हवेली मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत करण्याची किमया केली होती. पाचर्णे यांच्या वैयक्तिक जनसंपर्क दांडगा होता. यातच भाजपची साथ मिळाल्याने त्यांना दोन वेळा विजय संपादन करता आला.आजतरी पाचर्णे यांच्या तोडीचा उमेदवार भाजपकडे दिसत नाही.भाजपकडून सध्यातरी माजी जि.प.अध्यक्ष प्रदीप कंद यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.आपल्यालाच उमेदवारी मिळेल या आशेने कंद यांनीही तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.अलीकडच्या काळात कंद हे शिरूर तालुक्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याचे दिसून येत आहे.
नुकतेच शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती व तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक संतोष मोरे यांच्या ‘ कमल सीएनजी पंपाचे ‘ उद्घाटन कार्यक्रमाला कंद यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला उपस्थित नेत्यांपैकी बहुतांशी भाजपाचे नेते होते.अनेक वक्त्यांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त केले.राष्ट्रवादीची माजी आमदार पोपटराव गावडे यांनी आपल्या मनोगतात पंपाचे उद्घाटक आमदार राहुल कुल यांच्या कुटुंबाशी असलेल्या ऋणानुबंधाचा उल्लेख केला.कूल यांचे कौतुक करताना तुम्ही राजकारणात यशस्वी व्हाल असा आशीर्वाद दिला.याच वेळी कुल यांच्या बाजूला बसलेल्या कंद यांनाही तुम्ही देखील यशस्वी व्हाल.असा आशीर्वाद दिला.चक्क राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा आशीर्वाद मिळाल्याने कंद यांनाही त्यावेळेस हायसे वाटले असावे.व्यासपीठावर उपस्थित भाजपाच्या इतर पदाधिकारीही यामुळे सुखावले असावेत.असेच चित्र होते.गावडे यांच्या वक्तव्याने मात्र उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. सर्वांचे मनोगत व्यक्त झाल्यानंतर शेवटी बाजार समितीचे माजी सभापती ( राष्ट्रवादी) शशिकांत दसगुडे हे आभार प्रदर्शनासाठी पुढे आले.दसगुडे यांनीही आभार व्यक्त करताना माजी आमदार गावडे यांची री ओढत कंद यशस्वी होतील.अशा सदिच्छा दिल्या.यानंतर मात्र बराच वेळ कंद यांना मिळालेल्या आशीर्वाद व सदिच्छाची चर्चा रंगली.(भलेही गावडे यांचे आशीर्वाद व दसगुडे यांच्या सदिच्छा निर्मळ असतील)
पाचर्णे यांनी लढवलेल्या अनेक विधासभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे छुपे आशीर्वाद मिळाल्याचे सर्वश्रुत आहे.याची कंद यांनाही ‘चागलीच ‘ कल्पना असावी.त्यामुळे थेट आशीर्वाद मिळाल्याने कंद यांच्या मनान लाडू फुटले असावेत.हे आशीर्वाद प्रत्यक्षात किती कामाला येतात हे निवडणुकीतच समजेल.तोवर शिरूर हवेली भाजपला अपेक्षा बाळगायला काय हरकत आहे.आमदार पवार यांच्या विकासशिल प्रतीमेबद्दल दुमत नसावे,मात्र अलीकडच्या काळात काही पदाधिकारी त्यांच्यापासून दूर गेले आहेत.जिजामाता बँक व हवेली बाजार समिती निवडणुकीच्या पराभवानंतर विरोधक त्यांच्यावर टीका करू लागले आहेत.अशात घरातील(पक्षातील) मंडळींचेच आशीर्वाद विरोधकांना मिळाल्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.