शिरुरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: पाच राज्य पुरस्कार पटकावलेला ‘तेंडल्या’ चित्रपट पाच मे रोजी प्रदर्शित होत असून आम्हाला सहानुभूती नको नवोदित कलाकारांनी या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीला दाद हवी.यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहावा.असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार,क्रीडा समीक्षक, या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सुनंदन लेले यांनी येथे केले.
तेंडल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येथे आलेल्या लेले यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला.लेखक दिग्दर्शक तसेच शंभर कलाकार ही संपूर्ण टीमच नवोदित असून त्यांच्या पदार्पणाचा हा सिनेमा आहे.यातील प्रत्येकाने प्रचंड मेहनत घेतली असून आपले शंभर टक्के योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यामुळे प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पहावा व नवोदितांच्या मेहनतीला दाद द्यावी. असे आवाहन लेले यांनी प्रेक्षकांना केले आहे.लेले म्हणाले, चित्रीकरणासाठी एकाही सेटचा उपयोग करण्यात आला नसून लाईव्ह लोकेशन वर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या ‘लाईव्ह रेकॉर्डिंग’ ला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.या चित्रपटाची कथा व नवोदितांचा स्ट्रगल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आवडला असून त्याने या चित्रपटाचे प्रमोशन केल्याचे लेले यांनी सांगितले.प्रत्येक क्षेत्रात पहिली मॅच असते.तेंडल्या चित्रपटातील प्रत्येकाचीच ही पहिली मॅच असल्याने सचिनने सर्व नवोदितांना शुभेच्छा दिल्या आहेत.
स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या चैतन्य काळे व सचिन.जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून याबाबत बोलताना ते म्हणाले, कुठलाही प्रथितयश चेहरा या चित्रपटात नाही.भूमिकेला साजेशी पात्र यात निवडण्यात आली आहेत.प्रत्येकाने जीव ओतून काम केले असून दर्जेदार चित्रपट तयार झाला आहे.चित्रपटाला मिळालेले राज्य शासनाचे उत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शन, उत्कृष्ट बालकलाकार, उत्कृष्ट संपादन व उत्कृष्ट पदार्पण अभिनेता असे एकूण पाच पुरस्कार याची पावती आहे.राज मान्यता मिळाली आता लोकमान्यता मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहावा असे आवाहन काळे यांनी केले आहे.पत्रकार संवाद सभेचे आयोजक चित्रपट निर्माते,डॉ.संतोष पोटे हे संचालक असलेल्या सप्तरंग थिएटर्स, अहमदनगर यांनी पुणे व नगर जिल्ह्यातील चित्रपटगृहांमध्ये तेंडल्या चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात जबाबदारी घेतली असून मराठी चित्रपटांना प्रेक्षक वर्ग मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम या सप्तरंग थिएटर्स कडून केले जात आहे. डॉ.पोटे म्हणाले,तर महिन्याला विविध भाषांमधील १९ ते २० चित्रपट प्रदर्शित होतात.यात मराठी चित्रपटांचाही समावेश असतो.या चित्रपटांचे प्रमोशनचे महत्त्वाचे काम सप्तरंग थिएटर्सच्या माध्यमातून केले जात आहे. प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन मराठी चित्रपट पाहायला हवे.अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.डॉ. सुनिता पोटे,डॉ.प्रवीण गायकवाड,मानव हक्क परिषदेचे अध्यक्ष संदीप कुटे,बाजीराव कारखिले आदी यावेळी उपस्थित होते.दरम्यान शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने शहराध्यक्ष दिपाली काळे यांच्या हस्ते लेले यांचा सत्कार करण्यात आला.