बांदल यांची लोकसभेची वाट काटेरी

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क

प्रवीण गायकवाड

शिरूर:वीस महिने कारागृहात राहुन  बाहेर आलेल्या जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी राजकारणात सक्रिय राहताना लोकसभा निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त केला आहे.मात्र त्यांची लोकसभेची वाट काटेरीच दिसून येत आहे.कारण योग्य पक्षाची उमेदवारी मिळवणे व मिळालीच तर शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघात वर्चस्व निर्माण करणे त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.

            बांदल यांनी राजकारणात नेहमीच आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्रापूर ग्रामपंचायतचे सदस्य,सरपंच पदापासून जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती पदापर्यंत त्यांचा यशस्वी राजकीय प्रवास तालुक्याने पाहिला आहे. राजकीय डावपेचात माहीर असले तरी त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकलेले नाही. जिल्हा परिषद तसेच बाजार समितीचे निवडणुकीत त्यांनी दाखविलेला करिष्मा मात्र तालुका आजही विसरलेला नाही.२००७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत पाबळ केंदूर गटात राष्ट्रवादी काँग्रेसने जयश्री पलांडे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असलेल्या बांदल यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती.त्या गटात राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही बांदल यांनी आपल्या डावपेचाच्या जोरावर विजयश्री खेचून आणली होती. या निवडणुकीत विजय मिळाल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या बांदल यांना विधानसभेचे स्वप्न पडू लागले होते.
आमदारकीचे स्वप्न भंगले
           २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी तत्कालीन भाजपाचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता.२००९ विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारीचे आश्वासन मिळाले होते.मात्र ऐन वेळेस राष्ट्रवादीने अशोक पवार यांना उमेदवारी दिल्याने पाचर्णे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. या संधीचा फायदा घेत बांदल यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली होती.भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत बांदल यांना चांगली मते मिळाली.मात्र ते तिसऱ्या नंबरवर फेकले गेले. सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून मतदारांनी त्यांना स्वीकारल्यास नकार दिला होता.असाच काहीसा तो रिझल्ट होता.
           राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर जि. प.सभापती पदाची संधी
२०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी लोकशाही क्रांती आघाडीच्या माध्यमातून तळेगाव ढमढेरे रांजणगाव सांडस गटातून स्वतः निवडणूक लढवली.तळेगाव व रांजणगाव गणात उमेदवार उभे केले. या निवडणुकीत तिघेही विजयी झाले. या गटातही राष्ट्रवादीची ताकद असताना त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव केला.मात्र त्यानंतर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापतीपद मिळाले.२०१२ मध्येच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ते पुन्हा राष्ट्रवादीच्या विरोधात गेले.राष्ट्रवादी काँग्रेसने १८ पैकी दहा जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली होती.मात्र सभापती पदाच्या निवडणुकीत बांदल यांनी राष्ट्रवादीची तीन मते फोडून सभापती पद खेचून आणले होते.राष्ट्रवादीच्या दृष्टीने ही एक प्रकारे नाचक्कीच होती.त्यांच्या या करिष्म्याची त्यावेळी  जोरदार चर्चा झाली. राजकारणातील धुरंदरपणा काय असतो हे वेळोवेळी बांदल यांनी राष्ट्रवादीला दाखवून दिले होते.त्यावेळी बांदल हे सभापती झाले खरे, मात्र त्यांनी कालांतराने काही कारणास्तव सहीचे अधिकार संचालक रामभाऊ सासवडे यांच्याकडे दिले होते. सभापतीपद खेचून आणण्यात त्यांनी करिष्मा दाखवला.मात्र बाजार समितीला उर्जितावस्थेत आणण्याचा करिष्मा मात्र ते दाखवू शकले नाहीत.
     आमदार पवारांशी वैर कायम 
          राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध होते.मात्र शिरूर हवेलीचे आमदार अँड.अशोक पवार यांच्याशी मात्र त्यांचे कधीच पटले नाही. मतदारसंघात कोणत्याही कार्यक्रमात दोघे एकाच व्यासपीठावर आले, की बांदल हे आपल्या भाषणात आमदार पवार यांना टोला लगावण्यास कधीच चुकले नाहीत.बांदल यांच्यावर झालेल्या कारवाईमागे देखील ते अप्रत्यक्षरीत्या आमदार पवार यांना जबाबदार धरत आहेत. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांनी शिरूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार पवार यांचे थेट नाव न घेता हाच आरोप केला होता.
कोणत्या पक्षाची मिळणार उमेदवारी?
              बांदल यांनी राजकारणात सक्रिय राहण्याचे सुतोवाच करताना शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपा त्यानंतर लोकशाही क्रांती आघाडी अशा राजकीय प्रवासानंतर आता लोकसभा ते कोणत्या पक्षाच्या माध्यमातून लढवणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून विजय संपादन केला होता.सध्या भाजपचा या मतदारसंघावर डोळा असून आगामी निवडणुकीत या मतदारसंघात भाजप आपला उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी या मतदारसंघात दौरे करून मतदारसंघाचा आढावा देखील घेतला आहे. भाजपाला ही जागा मिळाल्यास बांदल हे भाजपाकडे उमेदवारी मागण्याची शक्यता आहे.बांदल यांच्यावर दाखल झालेले गुन्हे पाहता भाजप त्यांना उमेदवारी देतील की नाही हे सांगणे कठीण आहे.मुळात या मतदारसंघाचे तीन वेळेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आगामी निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केलेली आहे.ते सध्या शिवसेनेत असून (बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षाची भाजपाशी युती आहे.आढळराव तयारीत असताना भाजपाने तर आपला उमेदवार इथे देण्याची तयारी केली आहे.आढळरावांच्या दृष्टीने ही डोकेदुखी असून प्रत्यक्षात काय निर्णय होईल हे सांगणे कठीण आहे. भाजपाला ही जागा मिळाल्यास सध्याचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे भाजपकडून लढण्याची शक्यता असल्याची निष्फळ चर्चा वारंवार रंगताना दिसत आहे. या सगळ्या त्रांगड्यात बांदल यांचा कुठे निभाव लागणार हा प्रश्न आहे..शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) देखील या मतदारसंघात आपला उमेदवार रिंगणात उतरवणार हे नक्की.बांदल या पक्षाकडे उमेदवारी मागणार का?
      संपर्क दांडगा,वक्तृत्व दमदार तरीही मोहीम अवघड
२०१९ मध्ये बांदल हे शिरुर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक होते.मात्र पक्षाने अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली. उमेदवारी मिळाली नाही तरी या निवडणुकीत बांदल यांनी कोल्हे यांचा जोमाने प्रचार केला.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेत बांदल यांनी, विरोधी उमेदवारास पराभूत न केल्यास राजकारण सोडून देऊ.असे धमाकेबाज भाषण केले. प्रचाराच्या निमित्ताने बांदल यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.बांदल यांची जमेची बाजू पाहता, त्यांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांचा बऱ्यापैकी संपर्क आहे.पैलवान असल्याने त्यांचे जिल्ह्यातील पैलवान मंडळींशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.अंत्ययात्रा, दशक्रिया विधी तसेच विवाह समारंभाला आवर्जून हजेरी लावण्याची बांदलांना सवय आहे.वाचनाची आवड असल्याने त्यांचे वक्तृत्व बहरू लागले आहे. राजकीय, सामाजिक असो वा धार्मिक असो अशा कार्यक्रमांमध्ये आपल्या वक्तृत्वातून छाप सोडण्यासाठी नेहमीच ते प्रयत्न करतात.असे असले तरी विधानसभा निवडणूक जिंकता न आलेल्या बांदल यांच्यासमोर लोकसभा निवडणुकीचा आखाडा लढविणे आव्हानात्मक आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात शिरूर हवेली, खेड,जुन्नर,आंबेगाव,हडपसर व भोसरी असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.सध्याची परिस्थिती पाहता भोसरी वगळता इतर पाचही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या खासदाराला फारसा प्रभाव पाडता आला नसला तरी या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद लक्षणीय आहे.राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर विरोधकांना तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे.यात शंका नाही.बांदल हे ज्या कोणत्या पक्षाकडे उमेदवारी मागतील, त्या पक्षाला आपण किती तगडे आहोत हे त्यांना खात्रीशीररित्या पटवून द्यावे लागणार आहे.एकूणच बांदल यांचा इरादा मोठा असला तरी लोकसभेची त्यांची वाट मात्र काटेरी आहे.असेच दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.