नवीन शैक्षणिक धोरणाच्या विरोधात बोरा महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे आंदोलन
काळ्या फिती लावून पाळला निषेध दिन
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:नवीन शैक्षणिक धोरण रद्द करावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आज काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले.
शासनाने जाहीर केलेले नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी व समाजहिताचे नसल्याने हे धोरण रद्द करावे ही प्राध्यापकांची प्रमुख मागणी आहे.या धोरणामध्ये अनेक त्रुटी असून हे धोरण सर्वसामान्यांना झेपणारे नाही असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.या धोरणानुसार पदवीसाठी आता चार वर्षे लागणार आहेत.अभ्यासक्रमामध्ये ६०/४० टक्के असे विभाजन करण्यात आले असून यामध्ये साठ टक्के ऑफलाईन व ४० टक्के ऑनलाईन अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या मुद्द्यांबरोबरच अनेक समस्या व संभ्रम निर्माण करणारे मुद्दे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असून आमचा यास विरोध असल्याचे चां.ता.बोरा महाविद्यालय प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. ईश्वर पवार यांनी सांगितले.प्राध्यापकांची पदोन्नती वेळेवर व्हावी, जुनी पेन्शन योजना सुरू राहावी, प्राध्यापकांच्या सर्व रिक्त जागा नियुक्त कराव्यात, तात्पुरत्या शिक्षकांना नियमित करावे आदी मागण्या प्राध्यापकांच्या वतीने करण्यात आल्या आहेत. संघटनेच्या उपाध्यक्षा प्रा.क्रांती पैठणकर,सचिव प्रा.दत्तात्रय बोबडे,खजिनदार डॉ.सतीश पाटील व सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.