शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:मकरसक्रांती निमित्त वात्सल्यसिंधू फाऊंडेशनच्या महिलांनी ऊसतोड मजूर महिलांच्या पालावर हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करून अनोख्या वात्सल्याचे दर्शन घडवले.साडी चोळी, गृहोपयोगी वस्तू तसेच किराणा वाण म्हणून दिला.या वस्तूंपेक्षा या महिलांना वात्सल्यसिंधुकडून ‘आनंदरुपी वाण’ मिळाला.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मकरसंक्रांती निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेणे,आलेल्या सुवासिनींना वाण देणे ही आपली प्रथा, परंपरा आहे.मकरसंक्रांती नंतर जवळपास महिनाभर अशा कार्यक्रमांचे गृहिणी,महिला संस्था तसेच राजकीय मंडळीही आयोजन करतात.ऊसतोड कष्टकरी महिलांच्या जीवनात सण उत्सवाचा आनंद तो कसला.सण उत्सवाच्या दिवशीही डोईवरचा फाटका पदर तसाच असतो.प्राप्त परिस्थिती स्वीकारून त्या जगत असतात.सणाला या महिलांच्या अंगावर नवी साडी चोळी असावी,सणाचा त्यांनाही आनंद घेता यावा,म्हणून गेली सहा वर्षापासून वात्सल्य सिंधू फाउंडेशन रावसाहेबदादा घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावरील ऊसतोड मजूर महीलां समवेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करीत आहेत.या वर्षीही हा कार्यक्रम साजरा करताना,या महिलांना आनंदरुपी वाण देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला.
नवीन साडी चोळी,गृहोपयोगी वस्तू व किराणा वाण म्हणून मिळाल्याने जणू काही माहेरहून कोणी सण घेऊन आल्याची भावना या महिलांमध्ये निर्माण झाली.खेळ पैठणीचा हा कार्यक्रमही यावेळी घेण्यात आला.या खेळाचा महिलांनी चांगला आनंद लुटला.विजेत्या महिलांना बक्षीसही देण्यात आली.यामुळे या महिलांच्या चेहऱ्यावर उत्कटलेले भाव आम्हालाही आनंदाची अनुभूती देऊन गेल्याची प्रतिक्रिया वात्सल्यसिंधूच्या अध्यक्षा सुनंदा लंघे व सचिव उषा वाखारे यांनी व्यक्त केली.समाजातील उपेक्षित,वंचित घटकांच्या समस्या दूर करणे,त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणे ही आमची प्राथमिकता असून नुकतेच वात्सल्यसिंधूने कॅन्सर ग्रस्त रुग्णांना तसेच आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणासाठी मदत केल्याचे लंघे व वाखारे यांनी सांगितले.वात्सल्यसिंधूच्या सदस्य लता नाझिरकर,मनीषा टेंबेकर,अंजली गायकवाड,सना शेख,पल्लवी शेंगोर, प्रिया केदारी,माधुरी निगडे,ऋतू संघवी आदी यावेळी उपस्थित होते.मकाम संस्थेच्या अध्यक्षा साधना सावंत या आवर्जून उपस्थित होत्या.