नगरपरिषद शाळा क्रमांक एकच्या शिक्षकांचे कौतुकास्पद कार्य

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

प्रवीण गायकवाड

शिरूर:विद्यार्थ्यांना शिक्षण देणे व त्याचा पगार घेणे शिक्षकाचे एवढेच कर्तव्य न मानता शाळा व विद्यार्थ्यांप्रती समर्पक भावना मनात ठेऊन त्यांच्यासाठी योगदान देण्यास सर्वोच्च प्राधान्य देणारे येथील नगरपरिषद शाळा क्रमांक एकचे शिक्षक कौतुकाचा विषय ठरले आहेत.शाळेला रंगरंगोटी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी या शाळेतील आठ शिक्षकांनी स्वानिधीचे  योगदान देऊन इतर शिक्षकांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

          साधारण तीस ते चाळीस वर्षांपूर्वीचे शिक्षक व सध्याचे शिक्षण यांच्या मध्ये नेहमीच तुलना केली जाते. त्यावेळचे शिक्षक अतिशय समर्पक भावनेने सेवा देत असत.सध्या असे चित्र फारसे आढळत नाही.असे बोलले जाते.मात्र हे शत प्रतिशत खरे आहे.असे म्हणणे चुकीचे ठरेल.कारण नगरपरिषद शाळा क्रमांक एक मधील शिक्षक हे शाळा व विद्यार्थ्यांप्रती समर्पक भावना दाखवतनाचे आशादायक चित्र आहे.खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून फी घेतली जाते.यामुळे या शाळांमध्ये विविध प्रकारच्या सुविधा पहावयास मिळतात.नगरपरिषद शाळांना शासनाच्या माध्यमातून तुटपुंजा निधी मिळतो.त्यामुळे या शाळांच्या सुधारणेला तसेच विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्यात मर्यादा येतात.आपल्याही शाळेचे वातावरण स्वच्छ सुंदर असावे, इमारत जुनी असली तरी तिला रंगरंगोटी असावी, विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शालेय साहित्य,सुविधा उपलब्ध व्हाव्यात या भावनेतून नगरपरिषद शाळा क्रमांक एकच्या सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन रक्कम जमा केली.या रकमेतून सर्वप्रथम शाळेच्या वर्ग खोल्यांना रंगरंगोटी करण्यात आली.वर्गात ‘बोलक्या भिंती’ साकारण्यात आल्या.उर्वरित रकमेतून शाळेच्या बाहेरील बाजूसही रंगरंगोटी तसेच वर्ग बाहेरील भिंतीवर महापुरुषांची चित्रे रेखाटली जाणार असून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे मुख्याध्यापिका नंदा खंडागळे
उपशिक्षिका संपदा राठोड यांनी सांगितले.
           येथील लाटे आळी या परिसरात ही नगरपरिषद शाळा ( क्रमांक एक) असून सभोवतालच्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेतात. शाळेतील सर्वच शिक्षक उच्चशिक्षित असून या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळतानाचे आशादायक चित्र आहे. खाजगी शाळांमध्ये मिळणाऱ्या सुविधांप्रमाणे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही सुविधा मिळाव्यात हा आमचा मानस असून त्यामध्ये आम्ही खारीचा वाटा उचलत असल्याची कृतज्ञ भावना उपशिक्षिका संपदा राठोड यांनी व्यक्त केली.यासाठी  सभागृह नेते प्रकाश धारिवाल व प्रशासन अधिकारी पद्मावती दिंडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन  लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.आपल्या विद्यार्थ्यांना आनंददायी डिजिटल शिक्षण मिळावे म्हणून मागील वर्षी उपशिक्षिका राठोड यांनी स्वनिधी तसेच मित्र मंडळींकडून निधी जमा करून डिजिटल स्मार्ट टीव्ही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला.शाळा व विद्यार्थ्यांसाठी राठोड यांच्यासह इतर सर्व शिक्षकांची असलेली समर्पक भावना या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करीत असून यांचे भविष्य उज्वल करण्याचा प्रयत्न करीत आहे.मुख्याध्यापक खंडागळे, उपशिक्षिका राठोड यांच्यासह प्रतिभा आहेर,राजू लांघी,लहू गावडे,वनिता पडवळ,सोनाली माळी,प्रमिला तळेकर यांनी योगदान दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.