शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर: वाढलेले मतदान व मतदानाचा वाढलेला टक्का,लाडक्या बहिणींनी मतदान केंद्रावर केलेली मोठी गर्दी आणि एकूणच मतदानाच्या दिवशी मतदारसंघात बहुतांशी ठिकाणी जाणवलेले माऊली मय वातावरण यामुळे शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात २४ नोव्हेंबर पासून माऊली पर्वाची सुरुवात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मागील पंचवार्षिक (२०१९) शिरूर हवेली मतदारसंघात ३८४३२३ एवढी मतदार संख्या होती.यात २५८६८० म्हणजेच ६७.३१ टक्के मतदान झाले होते.यावेळी जवळपास ८२ हजार मतदार संख्या (४६६०४२) वाढली आहे.यातच ६८.५० टक्के मतदान झाले आहे.मागील पंचवार्षिकपेक्षा यावेळी मतदानात सव्वा टक्क्याने वाढ झाली आहे.एकूणच वाढलेले मतदान तसेच वाढलेला टक्का मिळून मागील पंचवार्षिक पेक्षा ८७ हजार मतदान जास्त झाले आहे.हे वाढलेले मतदान व वाढलेला टक्का माऊलींना फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.सुरुवातीला महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या दृष्टीने चांगले वातावरण होते.मात्र महायुतीच्या वतीने माऊली कटके यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून चित्र बदलत गेले. पवारांइतका राजकीय अनुभव नसलेल्या माऊलींनी प्रचारादरम्यान दाखवलेला सुसंस्कृतपणा नागरिकांना भावला.हवेलीचे माऊली शिरूर तालुक्यात चालणार नाही असा सुरुवातीला कयास होता.मात्र माऊली या तालुक्यात जिथे जिथे गेले तिथे लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले.शेकडोंच्या संख्येने नागरिक त्यांच्या स्वागतासाठी बाहेर आले.यात महिलांचा मोठा सहभाग होता.तीर्थक्षेत्र सहलीचा लाभ मिळालेली मंडळी प्रत्येक भागात माउलींना भेटत होती.या मंडळींचा भरभरून आशीर्वाद त्यांना मिळतानाचे चित्र होते.या मंडळींनी केवळ मतदान केले नाही तर, माऊलींचा प्रामाणिक प्रचार केला.या सर्व बाबींचे प्रतिबिंब मतदानाच्या दिवशी पहावयास मिळत होते.मतदार संघात बहुतांशी भागात मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर आल्याचे दिसून आले. मतदान केंद्र बाहेर माऊलींच्या नावाची चर्चा ऐकावयास मिळत होती.मतदान केंद्रांवर महिलांच्या मोठ्या रांगा पाहता लाडक्या बहिणी लाडक्या भावाला मतदान करण्यासाठी सरसावलेल्या की काय असा प्रश्न पडला.हा फॅक्टर देखील माऊलींच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.पवार यांना घोडगंगा तसेच अँटी इन्कमबन्सी फॅक्टरचा फटका बसण्याची शक्यता आहे.पवारांचा पराभव करण्यासाठी अनेक दृश्य,अदृश्य शक्ती कामाला लागल्याचे चित्र होते.
महायुतीतील घटक पक्ष भाजपाने मतदारसंघात कटके यांचे प्रामाणिकपणे काम केले.या पक्षाचे मतदार संघात ४० ते ५० हजार फिक्स मतदान आहे.याचाही फायदा कटके यांना मिळू शकतो.एकूणच शिरूर तालुक्यातील शिरूर ग्रामीण – न्हावरे,शिक्रापूर – सणसवाडी,तळेगाव ढमढेरे – रांजणगाव सांडस व वडगाव रासाई – मांडवगण फराटा या जिल्हा परिषद गटाची परिस्थिती पाहिल्यास वडगाव – मांडवगण वगळता इतर गटात माऊली यांना लीड मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिरूर शहरात नेमके कोणत्या उमेदवाराला लीड राहील याची नेहमीच सर्वांना उत्सुकता असते.माजी आमदार पाचर्णे यांना शहराने नेहमीच साथ दिली. मागील निवडणुकीत मात्र अशोक पवार यांना लीड मिळाले.यावेळी मात्र शहरात माऊली थोड्या मतांनी का होईना पुढे राहण्याची शक्यता आहे.शिरूर तालुका प्लस म्हटल्यावर हवेलीतील चित्र काय असा प्रश्न राहिला. असलेल्य होम ग्राउंड असलेल्या हवेलीत माउलींना मोठा लीड मिळण्याची शक्यता आहे.दोन्ही भागातील परिस्थिती पाहता माऊलींचा विजयाचा मार्ग सुकर होण्याचे चित्र निर्माण झाले असल्याची मोठी चर्चा मतदारसंघात आहे.